पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून पाच देशांच्या दौऱ्यावर

    28-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलैपासून ५ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांमध्ये घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया यांचा समावेश आहे. ब्राझीलमध्ये ते ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील.

पंतप्रधान मोदींचा हा दौरा २ जुलैपासून सुरू होईल. प्रथम ते घानाला जातील. ते २-३ जुलै रोजी घानामध्ये असतील. भारताच्या पंतप्रधानांचा हा दौरा तीन दशकांनंतर होत आहे. यादरम्यान, पंतप्रधान घानाच्या राष्ट्रपतींशी चर्चा करतील. ते दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा आढावा घेतील. ते आर्थिक, ऊर्जा, संरक्षण आणि विकास सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर देखील चर्चा करतील.

दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट देतील. पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांनी त्यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी ३-४ जुलै रोजी या कॅरिबियन देशाला भेट देतील. पंतप्रधान म्हणून हा त्यांचा पहिलाच दौरा असेल. या भेटीदरम्यान, पंतप्रधान त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्षा क्रिस्टीन कार्ला कांगालु आणि पंतप्रधान बिसेसर यांच्याशी चर्चा करतील. ते भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा करतील. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात, पंतप्रधान अर्जेंटिनाला भेट देतील. त्यांना राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदी ४-५ जुलै रोजी अर्जेंटिनाला भेट देतील. पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिले यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

आपल्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला द सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान 5 ते 8 जुलै 2025 दरम्यान 17 वी ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी ब्राझीलला जातील आणि त्यानंतर त्यांचा राजकीय दौरा होईल. पंतप्रधानांचा हा चौथा ब्राझील दौरा असेल. यामध्ये जागतिक प्रशासन, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयतेला बळकटी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, हवामान कृती, जागतिक आरोग्य, आर्थिक आणि वित्तीय बाबी, या मुद्द्यांचा समावेश असेल. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान अनेक द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान ब्रासीलिया येथे जातील.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. नेटुम्बो नंदी-नदाइटवाह यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान 9 जुलै 2025 रोजी नामिबियाच्या दौऱ्यावर जातील. पंतप्रधानांचा हा पहिलाच नामिबियाचा दौरा असेल आणि भारताच्या पंतप्रधानांचा हा तिसरा नामिबिया दौरा असेल. आपल्या भेटीदरम्यान, पंतप्रधान नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नंदी-नदैतवाह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.