‘ऑपरेशन सिंदूर’ - नव्या पिढीतील ‘नॅरेटिव्ह वॉर’चा उगम

    28-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल रोजी २६ निष्पाप हिंदू यात्रेकरूंना ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या लष्कर-ए-तोयबाच्या छुप्या गटाने क्रूरपणे ठार केले. मात्र हे केवळ शारीरिक हल्लेच नव्हते. या हल्ल्यानंतर लगेचच माहितीयुद्धदेखील लढले जात होते. परिणामी, या नॅरेटिव्ह वॉरच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक ठरते.

दिल्लीस्थित विवेकानंद फाउंडेशन या थिंकटँकने पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर माहिती युद्धाचा आढावा घेणारा विशेष पेपर प्रसिद्ध केला आहे. लेफ्टनंट जनरल (नि.) शोकिन चौहान हे त्याचे लेखक आहेत. यामध्ये त्यांनी माहितीयुद्धातील पाकचे धोरण, त्यास भारताने दिलेले प्रत्युत्तर आणि भविष्यात घ्यावयाची काळजी; यावर भाष्य केले आहे.

पेपरनुसार, पाकिस्तानने काही तासांतच एक सुसंघटित, बहुस्तरीय माहिती युद्ध चालू केले होते. समाजमाध्यमे, आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि तथाकथित मानवाधिकार संघटनांच्या माध्यमातून भारतावरच खोटे आरोप लावले गेले—की हे हत्याकांड भारताने स्वतःच केले होते. त्याद्वारे दहशतवादी हल्ला झाकणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते.

आजच्या डिजिटल युगात युद्ध केवळ रणभूमीवरच नव्हे, तर ट्विटर, यूट्यूब आणि न्यूज रूम्समध्ये लढले जाते. भारताने शत्रूंविरुद्ध सैनिकी विजय मिळवले असले तरी, आंतरराष्ट्रीय जनमताकडेदेखील लक्ष देणे आवश्यक असते. अन्यथा सैनिकी विजयाचे राजनैतिक मूल्य शून्य ठरते. पाकनेदेखील तसे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने यावेळी प्रामुख्याने माहितीयुद्धामध्येही आघाडी घेतली. भारतीय सैन्यदलांच्या सविस्तर पत्रकारपरिषदा, तेथे दाखवण्यात आलेले पुरावे आणि सैन्याधिकाऱ्यांचा थेट संवाद यामुळे पाकचा नॅरेटिव्ह खोडण्यात भारतास यश आले आहे.

असा होता पाकचा पाचस्तरीय नॅरेटिव्ह

1. खोटे आरोप

2. बनावट व्हिडिओ आणि भावनिक प्रतिमानिर्मिती

3. आंतरराष्ट्रीय ‘तज्ज्ञां’चा वापर

4. बनावट अहवाल

5. सोशल मीडियावर बॉट्सचा प्रसार

‘सेकंड फ्लॅश इन्फोर्मेशन धोरण’ महत्त्वाचे

आगामी काळात अशा परिस्थितीमध्ये आपले वर्चस्व राखण्यासाठी भारताला ‘सेकंड फ्लॅश इन्फोर्मेशन’ धोरण राबवावे लागेल, असे मत लेफ्टनंट जनरल (नि.) शोकिन चौहान यांनी व्यक्त केले आहे. त्यामध्ये या बाबींचा समावेश असेल -

· २४x७ संप्रेषण यंत्रणा

· सांस्कृतिक राजनयास बळकटी देणे

· जागतिक थिंक टँक्समधील प्रभाव वाढवणे

· एआय आधारित फेक न्यूज ट्रॅकिंग