मणिपूरमध्ये लवकरच सरकार स्थापन होणार – एन. बिरेन सिंह

    28-Jun-2025   
Total Views |

नवी दिल्ली : राष्ट्रपती राजवटीत असलेल्या मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या तयारीस वेग आला आहे. राज्यात लवकरच एक नवीन लोकप्रिय सरकार स्थापन होईल. यासंदर्भात आमदारांसोबत नियमित बैठका घेतल्या जात आहेत, असे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले आहे.

मणिपूर भाजप प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमात बोलताना बिरेन सिंह म्हणाले, आम्ही शक्य तितक्या लवकर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यातील परिस्थिती बघितल्यास सरकार लवकरच स्थापन होईल. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनाही लोकप्रिय सरकार हवे असून आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी काम करत आहोत. राज्यात शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. सरकार स्थापन करण्यासाठी पावले उचलता यावीत यासाठी आम्ही आमदारांच्या नियमित बैठका घेत आहोत, असे माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले.

राज्यातील अंमली पदार्थांच्या समस्येवर बोलताना ते म्हणाले, बेकायदेशीर घुसखोर आणि अंमली पदार्थ माफिया संपूर्ण ईशान्य भारतासह देशाला प्रभावित करत आहेत. या समस्येवर काम सुरू असून राज्यात सकारात्मक बदल होत आहे, असेही ते म्हणाले.