...तर पाकिस्तान आणि भारतात कुठलेच अंतर राहिले नसते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

25 Jun 2025 13:00:12


मुंबई : आणीबाणीच्या काळात जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतात कुठलेच अंतर राहिले नसते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवार, २५ जून रोजी राजभवन येथे 'संविधान हत्या दिवस' आणि आणीबाणी विरोधी संघर्ष केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ 'लोकशाही सोहळा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रत्येक देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात एक घटना अशी आली की, त्यावेळी जे देश लोकशाही वाचवू शकले तिथे ती चिरकाल टिकली. पण ज्या देशांमध्ये लोकशाही वाचली नाही ते देश आजही तानाशाहीखाली पाहायला मिळतात. १९७५ मध्ये भारतावरही तीच वेळ आली होती. जर आमच्या लोकतंत्र सेनानींनी लोकशाही वाचवली नसती तर पाकिस्तान आणि भारतात कुठलेच अंतर राहिले नसते. हा देश लोकशाही पुरस्कृत करणारा देश आहे. त्यामुळे आम्ही संघर्ष उभा करून लोकशाही जिवंत केली. आता कुणीही प्रयत्न केला तरीही भारतातली लोकशाही कुणीही संपवू शकत नाही," असे ते म्हणाले.

औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं भोवलं! माजी आमदारावर गुन्हा दाखल

"आणीबाणीच्या काळ्या कालखंडाला आज ५० वर्ष पूर्ण होत आहेत. भारतात लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी लोकतंत्र सेनानींनी एक मोठा संघर्ष केला असून त्यामुळे आपण भारताची लोकशाही आम्ही वाचवू शकलो. म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास २० वर्षे तुरुंगात होते. माझ्या काकूसुद्धा तुरुंगात होत्या. पंरतू, आणीबाणीने कुणाचेही मनोबल खच्चीकरण केले नाही. कारण आपल्याला देशाची लोकशाही वाचवायची आहे, हे सगळ्यांना माहिती होते," असेही ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0