साठ्ये कॉलेजच्या इमारतीवरून उडी! २१ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

19 Jun 2025 17:43:22


मुंबई : विलेपार्ले येथील नामांकित असलेल्या साठ्ये महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. गुरुवार, १९ जून रोजी सकाळी ही घटना घडली असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

संध्या पाठक (वय २१) असे या मुलीचे नाव असून ती साठ्ये महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या शिकत होती. गुरुवारी सकाळी महाविद्यालयाच्या परिसरात तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतू, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

वर्धापन दिन सोहळा सुरु होण्याआधीच मुंबईत उबाठा गटाला खिंडार!

दरम्यान, ही आत्महत्या आहे की, अपघात याबाबत अद्याप स्पषता आलेली नाही. तसेच संध्या पाठक हिच्या कुटुंबियांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे. मात्र, प्राथमिक तपासात संध्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संध्या तिसऱ्या मजल्यावर फिरत असल्याचे आढळून आले.

त्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. संध्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. संध्याने आत्महत्या केली की, तिचा घातपात झाला हे तपासानंतरच उघड होईल.

"आज दिनांक १९.०६.२०२५ रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनीटांच्या सुमारास साठ्ये महाविद्यालयात वी एस सी स्टॅटिस्टिक्स अभासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी संध्या पाठक ही महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना आढळली. सदर घटनेचा आवाज झाल्याने महाविद्यालयात उपस्थित कर्मचारी आणि दोन विद्यार्थी घटना स्थळी मदतीसाठी धावत गेले आणि सदर विद्यार्थीनीला महाविद्यालय नजिक असणाऱ्या गावडे हॉस्पिटलमध्ये तातडीच्या वैदयकीय उपचारांसाठी तात्काळ दाखल केले. तेथे उपचाराच्या दरम्यान हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महाविद्यालयाने सदर विद्यार्थीनीच्या पालकांशी त्वरीत संपर्क साधून विद्यार्थीनीच्या पालकांना बोलवून घेतले. सदर घटनेसंदर्भात विलेपार्ले पोलीस त्याबाबत अधिकचा तपास करीत असून महाविद्यालय विलेपार्ले पोलीस विभागास सर्वतोपरी मदत करीत आहे," असे साठ्ये महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0