
पुणे : पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव मार्गावर भीषण अपघात झाला असून यात ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तर यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि पीकअप टेम्पोच्या धडकेने हा अपघात घडला आहे.
बुधवार, १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास जेजुरी-मोरगाव मार्गावर बारामतीच्या दिशेने निघालेली एक कार रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यात टेम्पोमधून साहित्य बाहेर काढणारे चार मजूरांसह कारमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत आहे. मृतांमध्ये उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीचा समावेश आहे.
सोमनाथ रामचंद्र वायसे (ता. पुरंदर), रामु संजीवन यादव (ता. पुरंदर), अजय कुमार चव्हाण (उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर), किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर), अश्विनी शंकर ऐसार (सोलापूर), अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता. इंदापूर) अशी मृतांची नावे आहेत. तर आणखी एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.