राज्यभरात पावसाचे थैमान! रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट; मुंबई-पुण्यात मुसळधार
19-Jun-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले असून रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवार, १९ जून रोजी सकाळपासूनच राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई-पुण्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर गुरुवारी रात्री ११:३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन आणि जलक्रीडा थांबविण्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि खालापूरमधील पाताळगंगा नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आणि कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
बुधवारपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, गुरुवारीही पावसाचा जोर कायम असून मुंबई शहर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरारमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण, गोवा आणि पुणे, सातारा, नाशिकच्या घाट भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.