गांधीनगर : अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक रद्द करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे हे विमान रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घनेनंतर पहिल्यांदाच हे विमान लंडनला जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.
अलीकडेच अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेत २४१ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स आणि ज्या वसतीगृहावर विमान कोसळलं तेथील विद्यार्थी आणि डॉक्टरांसह एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला विमान जाणार होते. परंतू, एअर इंडियाचे AI159 हे विमान तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आले.
प्रवाशांचा संताप!
दुपारी १ वाजताची विमानाची वेळ होती. त्यानंतर हे विमान विलंबाने असून ते ३ वाजता उड्डाण घेणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. परंतू, त्यानंतर हे विमानच रद्द करण्यात आले. तसेच उद्या सकाळी ११.४० वाजता विमानाची वेळ असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे प्रवाशांचा संताप झाला असून त्यांच्याकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.