"राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यामुळे 'ते' वाक्य वापरून...", मंत्री आशिष शेलारांनी सांगितला भेटीचा तो किस्सा

16 Jun 2025 12:18:06


मुंबई : राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असे वाक्य वापरुन गैरसमज पसरवू नका, अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मंत्री आशिष शेलार यांना पत्रकारांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, "कोण काय म्हणतो मला माहिती नाही, कोण कोणाला भेटलं मला माहिती नाही. पण तुमचं वाक्य करेक्ट करतो राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असं वाक्य वापरुन गैरसमज पसरवू नका."

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजनांची घटनास्थळी भेट! बचावकार्याचा आढावा घेत जखमींची केली विचारपूस

उद्धवजींनी मुंबई ओरबाडून खाल्ली!

"उद्धवजींनी ओरबाडून मुंबई खाल्ली. करुन दाखवले म्हणताना अजून दोन घरे बनवून दाखवली. मुंबईकरांच्या तोंडातला घास, सण, संस्कृती, प्रथा, परंपरा, रोजगार ओरबाडून खाल्ला. उद्धवजींच्या काळात मिठी नदीच्या गाळातले पैसे खाल्ले गेले. नालेसफाईत बेमालूमपणे ओरबाडले. खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये महापालिकेतील अर्थसंकल्पीय तरतूदींवर ताव मारला. आता चोर मचाये शोर अशा पद्धतीने उद्धवजी आमच्यावर टीका करत आहेत," असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "महाविकास आघाडी आणि उद्धव सेनेने मुर्तीकारांना देशोधडीला लावण्याचे काम केले. गणेशोत्सव आणि सार्वजनिक पूजन होऊच नये अशा भूमिका घेतल्या. या सगळ्याबाबतीतील हिंदुत्व टिकवण्याची, मुंबईतील गणेशोत्सव टिकवण्याची लढाई भारतीय जनता पक्षाने शिरावर घेतली असून आता पीओपीच्या मुर्त्यांना परवानगी मिळाली आहे, शाडू आणि मातीच्या मुर्त्या बनवणे चालूच राहील. विसर्जनाच्या बाबतीत राज्यसरकार धोरण ठरवेल आणि विसर्जनाचीही अडचण दूर होईल," असेही मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.




Powered By Sangraha 9.0