कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजनांची घटनास्थळी भेट! बचावकार्याचा आढावा घेत जखमींची केली विचारपूस
16-Jun-2025
Total Views |
पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ३९ जणांचा वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला.
रविवार, १५ जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले असून जखमी झालेल्या नागरिकांना मावळ येथील पवना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी या सर्व नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
तसेच त्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात अशा सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या. या दुर्घटनेतील मृताच्या वारसांना सरकारतर्फे पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
काय घडलं?
रविवारी दुपारी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घटना घडली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पावसाळ्यात या ठिकाणी रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात. कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे १०० ते १५० पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. नदी ओलांडताना अनेक पर्यटक जीर्ण झालेल्या या पुलावर वाहने घेऊन चढले होते. त्यामुळे पुलावरील वजन वाढले आणि हा पूल कोसळला.