बेस्टला आर्थिक कोंडीतून काढण्यासाठी दरवाढ; अधिकृत परिपत्रक जारी

    09-May-2025
Total Views |
 
mumbai BEST Fare hike
 
मुंबई : ( mumbai BEST Fare hike ) बेस्टला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ केली आहे. बेस्टच्या तिकीट दरात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली असून ही दरवाढ गुरुवार,दि. ८ मेपासून लागू होणार आहे. बेस्ट प्रशासनाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक काढून याची माहिती दिली आहे.
 
ठरावाद्वारे बेस्ट उपक्रमाच्या प्रवासभाडे सुसूत्रीकरण बेस्ट समिती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेची मंजुरी प्राप्त झालेली असून या प्रस्तावित प्रवासभाडयाची अंमलबजावणी गुरवार ८ मे २०२५ पासून करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टच्या प्रवासासाठी दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच पाच किमीसाठी ५ रुपयांना मिळणारे तिकीट १० रुपये, तर एसी बसचे ६ रुपयांचे तिकीट १२ रुपये इतके होणार आहे. तर मासिक पासमध्ये तब्बल ३५० रुपयांची वाढ होणार आहे. प्रत्येक पाच किलोमीटरमागे पाच रुपयांचे भाडे वाढणार आहे.
 
यापूर्वी, बेस्टने वर्ष २०१८ मध्ये तिकीट दरात वाढ केली होती. साध्या बसचे किमान भाडे ८ रुपये, तर वातानुकूलित बसचे किमान भाडे २० रुपये करण्यात आले होते. २०१९ मध्ये हा निर्णय बदलण्यात आला. मात्र, तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढ करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी देण्यात आली आहे.
 
नवे तिकीट दर (साध्या बससाठी)
 
5 किमी – ₹१०
10 किमी – ₹१५
15 किमी – ₹२०
20 किमी – ₹ ३०
 
एसी बसचे नवे तिकीट दर
 
5 किमी – ₹12 (पूर्वी ₹6)
10 किमी – ₹20 (पूर्वी ₹13)
15 किमी – ₹30 (पूर्वी ₹19)
20 किमी – ₹35
 
मासिक पासचे दर (साध्या बससाठी)
 
5 किमी – ₹800 (पूर्वी ₹450)
10 किमी – ₹1250
15 किमी – ₹1700 (पूर्वी ₹1650)
20 किमी – ₹2600
 
एसी बसचे पास दर
 
5 किमी – ₹1100
10 किमी – ₹1700 (पूर्वी ₹1400)
15 किमी – ₹2300 (पूर्वी ₹2100)
20 किमी – ₹3500 (पूर्वी ₹2700)