मुंबई : अनेक सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आल्यानंतर आता मंत्री आदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब लक्षात आली असून तेव्हापासूनच त्यांना लाभ देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण आणि नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २ हजार २८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - वैष्णवी हगवणेच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे? बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय
योग्य व्यक्तींना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील!
त्या पुढे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे," असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.