वैष्णवी हगवणेच्या बाळाची जबाबदारी कुणाकडे? बाल कल्याण समितीचा मोठा निर्णय
31-May-2025
Total Views |
मुंबई : पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवीची आई स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे देण्यात आली आहे. बाल कल्याण समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल…
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवीला ९ महिन्यांचे बाळ आहे. मात्र, तिच्या मृत्यूनंतर तिची नणंद करीश्मा हगवणे हिने तिचे बाळ निलेश चव्हाणकडे सोपवले. त्यानंतर २० मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर भागात असलेल्या निलेश चव्हाणच्या घरी गेले असता त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून परत पाठवले. कस्पटे कुटुंबियांनी त्याच्याकडे बाळाची मागणी केल्यावर त्याने नकार दिला.
त्यानंतर कस्पटे कुटुंबियांनी निलेश चव्हाणविरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवत त्याची हेळसांड केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पुढे एका अज्ञात व्यक्तीने वैष्णवीच्या कुटुंबियांना फोन करून बाणेरच्या हायवेवर बाळ त्यांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर आता हे बाळ वैष्णवीची आई स्वाती कस्पटे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, "पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा ९ महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी आणि वैष्णवी हगवणे यांच्या आई स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक आणि कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे. यापुढे वैष्णवी हगवणे यांचा मुलगा कु. जनक हगवणे याचा कायदेशीर ताबा स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे असेल. बालकाच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी स्वाती कस्पटे यांची असेल," असे त्यांनी सांगितले.