इस्लामाबाद : (Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
“जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू”
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हे एका विद्यापीठात भाषण करत होते. तिथे त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा उल्लेख केला. तर भाषणादरम्यान अहमद चौधरी यांनी दहशतवादी हाफिज सईदची भाषा वापरल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, “जर तुम्ही आमचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू.” अशी पोकळ धमकी भारताला दिली आहे.
पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडी दहशतवाद्यांची भाषा
२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि भारत आणि अमेरिकेविरुद्ध प्रक्षोभक भाषणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तैय्यबाचा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद यानेही काही दिवसांपूर्वी असेच विधान केल्याचे पाहायला मिळाले होते. “जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास थांबवून टाकू. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील”, अशी धमकी देणारा हाफिज सईद याचा व्हिडिओ आहे.