९ महिन्यांच्या बाळाचा तातडीने शोध घ्या! मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आदेश; अखेर वैष्णवी हगवणे यांचं बाळ सापडलं

22 May 2025 13:03:02
 
Vaishnavu Hagvane
 
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांचे ९ महिन्यांचे बाळ कुठे आहे? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या आदेशानंतर अखेर ते बाळ ताब्यात घेण्यात आले आहे.
 
वैष्णवी हगवणे यांनी १६ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, त्यानंतर त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. वैष्णवी यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले असून हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून त्यांचा छळ होत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालातही अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.
 
हे वाचलंत का? -  "विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तान कनेक्शन..."; चित्रा वाघ यांची मोठी मागणी
 
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर वैष्णवी यांचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत. वैष्णवी यांना ९ महिन्यांचे मूलसुद्धा आहे. परंतू, त्यांच्या मृत्यूनंतर हे मूल कुठे आहे याबाबत कुणालाही माहिती नव्हती.
 
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर वैष्णवी यांचे बाळ त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात इतर कारवाई होत असताना वैष्णवी यांचे ९ महिन्यांचे बाळ कुठे आहे? याबाबत तातडीने शोध घ्या आणि ते बाळ त्यांच्या आईकडे सुपूर्द करा, असे आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिले. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
 
वैष्णवी हगवणे यांच्या बाळाचा शोध लागला असून वैष्णवी यांच्या पालकांकडे म्हणजेच कस्पटे कुटुंबियांकडे ते सोपवण्यात आले आहे. शशांकने त्याचा मित्र निलेश चव्हाणकडे वैष्णवीचे बाळ दिल्याचा आरोप कस्पटे कुटुंबाने केला होता.
 
 
 
Powered By Sangraha 9.0