"विजय वडेट्टीवारांचं पाकिस्तान कनेक्शन..."; चित्रा वाघ यांची मोठी मागणी
22-May-2025
Total Views |
मुंबई : विजय वडेट्टीवार यांचे पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला हवे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी एक वादग्रस्त विधान करून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचा अवमान केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.
काय म्हणाले वडेट्टीवार?
"पाकिस्तानने ५ हजार चायनामेड ड्रोन पाठवले. त्या ड्रोनची किंमत १५ हजार रुपये आहे. आपल्या क्षेपणास्त्राची किंमत १५ लाख रुपये आहे. १५ हजार रुपयांचे एक ड्रोन पाडण्यासाठी आपण १५ लाखांचे क्षेपणास्त्र डागले," असे विधान विजय वडेट्टीवारांनी केले होते.
यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "या विरोधकांना राष्ट्रद्रोहाचा रोग जडलाय का? उठसूठ आपल्या सैनिकांच्या शौर्यावर आणि युद्धनीतीवर सवाल विचारणाऱ्या वडेट्टीवारांनी पाकिस्तानकडून सुपारी घेतली की, पाकिस्तानचे प्रवक्तेपद स्वीकारले? तिकडे पाकिस्तानी सैन्यदल जेव्हा प्रेसकॉन्फरन्स घेतात तेव्हा तिथे वडेट्टीवारांचे व्हिडिओ दाखवले जातात त्यामुळे विजय वडेट्टीवार यांचे पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला हवे," अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.