मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा दणका बसला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित खटल्यांमुळे २०२२ पासून स्थगित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अंतरिम आदेश दिला. येत्या चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले. त्यानुसार आता हालचाली सुरु झाल्या आहेत.
हे वाचलंत का? - खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांची टीका! पवारांनी फटकारलं, म्हणाले, "आंतरराष्ट्रीय मुद्यांवर..."
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूकीसंदर्भात एक महत्वाची माहिती पुढे आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ च्या प्रभाग रचनेनुसारच महापालिकेची निवडणूक होणार असल्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या हद्दीत असलेल्या २२७ प्रभागांमध्ये निवडणूकीसाठी तयारी सुरु झाल्याचेही बोलले जात आहे.
उद्धव ठाकरेंना दणका?
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय शिवेसेनेच्या फायद्याचा असल्याचे सांगत भाजपने याला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलून पुन्हा महापालिकेची सदस्य संख्या २३६ वरून २२७ केली. पुढे या बदलेल्या निर्णयाला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि तेव्हापासूनच निवडणूका रखडल्या. मात्र, आता २०२२ पूर्वी असलेल्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणूका उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.