खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांची टीका! पवारांनी फटकारलं, म्हणाले, "आंतरराष्ट्रीय मुद्यांवर..."

    21-May-2025
Total Views |
 
Sanjay Raut & Sharad Pawar
 
मुंबई : आंतरराष्ट्रीय मुद्यांवर स्थानिक राजकारण आणू नका, अशा शब्दात शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारले आहे. केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळावर राऊतांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
ऑपरेशन सिंदूरमागची भूमिका जगाला सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ स्थापन केले असून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू मांडणार आहेत. या शिष्टमंडळात उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचादेखील समावेश आहे. परंतू, संजय राऊतांनी यावर टीका केली होती.
 
हे वाचलंत का? -  "तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर..."; तिरंगा यात्रेतूनत प्रविण दरेकरांचा पाक आणि चीनला इशारा
 
काय म्हणाले संजय राऊत?
 
"दहशतवादासंदर्भात इतक्या घाईघाईने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती. शिवसेनेचे शिष्टमंडळ पाठवताना आम्हाला विचारले का? यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी यापैकी कोणी दिसत नाही. मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जाते हे कोणत्या आधारावर सांगता? एकनाथ शिंदेच्या आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य जास्त आहे. त्यामुळे एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळायला हवी होती," असे विधान त्यांनी केले.
 
यावरून शरद पवारांनी राऊतांचे चांगलेच कान टोचले. शरद पवार म्हणाले की, "पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात मीसुद्धा एक सभासद होतो. त्यामुळे ज्यावेळी आंतरराष्ट्रीय प्रश्न येतात त्यावेळी पक्षीय भूमिका घ्यायची नसते. संजय राऊतांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या पक्षाचेही एक सदस्य या शिष्टमंडळात दिसतो. त्यामुळे शक्यतो इथे स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका आहे," अशा शब्दात त्यांनी संजय राऊतांना फटकारले.