नवी दिल्ली : (India VS Pakistan) 'भारताच्या कोणत्याही लष्करी कारवाईला त्वरित जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल', पाकिस्तान लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी गुरुवारी १ मे रोजी झेलममधील टिल्ला फायरिंग रेंजमध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षण सरावाला भेट दिली.
गेल्या आठवड्यात काश्मीरच्या पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात आल्याची माहिती आहे. याचबरोबर नियंत्रण रेषेवर (LOC) पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी लष्कराकडून सलग आठव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूर भागातील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्करी चौक्यांकडून गोळीबार सुरु आहे. भारतीय लष्करांच्या जवानांकडूनदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
हे वाचलंत का? - पाकिस्तानच्या 'आयएसआय'साठी हेरगिरी करणाऱ्याला जैसलमेरमधून अटक, गुप्तचर विभागाची कारवाई
LOC वर पाककडून गोळीबाराच्या घटना :
- १ एप्रिल : कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सुरुंग स्फोट, गोळीबार. घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत.
- २२- २३ एप्रिल : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर तट्टापाणी सेक्टर, पूंछमध्ये गोळीबार. कोणतीही जीवितहानी नाही.
- २४- २५ एप्रिल : कुपवाडातील लीपा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार.
- २५-२६ एप्रिल : पाकिस्तानी सैन्याकडून LOC वरील विविध ३४ क्षेत्रांवर गोळीबार.
- २६-२७ एप्रिल : उत्तर काश्मीरमधील कुपवाडात लीपा सेक्टर मध्ये गोळीबार. कोणतीही जीवितहानी नाही. तसेच कुपवाडातील टीएमजी आणि रामपूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरुन गोळीबार.
- २७-२८ एप्रिल : कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात LOC ओलांडून पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांकडून गोळीबार.
- २८-२९ एप्रिल : कुपवाडा, बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, भारताकडूनही चोख प्रत्युत्तर.
- २९-३० एप्रिल : नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी चौक्यांकडून गोळीबार.
- १ आणि २ मे : कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा, अखनूर भागातील LOCवर पाकिस्तानकडून गोळीबार.