पाकिस्तानच्या 'आयएसआय'साठी हेरगिरी करणाऱ्याला जैसलमेरमधून अटक, गुप्तचर विभागाची कारवाई

    02-May-2025   
Total Views |
 
 
pakistani isi spy pathan khan arrested
 
 
मुंबई : (Pakistani ISI Spy Arrested) पाकिस्तानच्या 'आयएसआय' (ISI) साठी हेरगिरी करणाऱ्या पठाण खानला राजस्थानच्या जैसलमेरमधून अटक करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेल्या हालचाली आणि पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. अशातच आता भारतीय गुप्तचर विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे.
 
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून ही कारवाई केली आहे. पठाण खान याला एक महिन्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते आणि तेव्हापासून त्याची चौकशी सुरू होती. राजस्थान इंटेलिजेंसने गुरुवार दि. १ मे रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. पठाण खान विरुद्ध ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 
जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटल्याप्रमाणे, पठाण खान २०१३ मध्ये पाकिस्तानला गेला होता. जिथे तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. पाकिस्तानमध्ये त्याला पैशाचे आमिष दाखवून हेरगिरीचे प्रशिक्षण मिळाले. २०१३ नंतरही, तो तेथे जाऊन पाकिस्तान गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांना भेटत राहिला आणि जैसलमेर आणि आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानी हँडलर्सना देत राहिला. पठाण खान सीमाभागातील लष्करी हालचाली, प्रशिक्षण शिबिरांची माहिती, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवत होता. 
 
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून पठाण खानची सखोल चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून मिळालेली माहिती आणि संवाद तपासणे सुरू आहे. त्याच्याविरोधात गोपनीय माहितीचा अपवापर, राष्ट्रविरोधी कारवाया, सोशल मीडियाद्वारे हेरगिरी यासारख्या गंभीर आरोपांची चौकशी सुरू आहे. संरक्षण यंत्रणांनी ही कारवाई करत पाकिस्तानला मोठा संदेश दिला आहे.
 
 
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\