मुंबई : संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जागा होताना दिसतो आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुंबईतही दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंगापूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या १४ हजार २०० वर पोहोचली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - 'ती' गोष्ट राऊतांनी एकदा 'रोखठोक' मध्ये लिहावी! रावसाहेब दानवेंचं आवाहन
दरम्यान, मुंबईतही दोन संशयित कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लक्षणे आढळली असून त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. परंतू, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसून त्यांना असलेल्या इतर आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९३ इतकी आहे. दरम्यान, इतर देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भात लक्षात घेता नागरिकांना काळजी घेण्याचे आणि न घाबरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.