'ती' गोष्ट राऊतांनी एकदा 'रोखठोक' मध्ये लिहावी! रावसाहेब दानवेंचं आवाहन
19-May-2025
Total Views |
जालना : संजय राऊत कोणत्या कारणासाठी तुरुंगात गेले हे त्यांनी एकदा त्यांच्या सामनाच्या रोखठोक या सदरात लिहावे, असे आवाहन भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. रविवार, १८ मे रोजी जालना येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, "एखादे पुस्तकात आपला जीवनप्रवास असतो. मी माझ्या आयुष्यात कोणकोणत्या संकटांना तोंड देऊन इथपर्यंत पोहोचलो हे साधारणत: पुस्तकात नमूद असते. पण एखादे पुस्तक केवळ आणि केवळ लोकांवर आरोप करण्यासाठी लिहिले असल्यास त्याला पुस्तक म्हणता येणार नाही. संजय राऊतांची भाषा, बोली, त्यांचे हावभाव रोज महाराष्ट्राची जनता न वाचता पाहते. संजय राऊतांनी जे अनुभव पुस्तकात सांगितले, ते काही स्वातंत्र्याचा लढा लढून तुरुंगात गेले नव्हते. ते कोणत्या कारणासाठी तुरुंगात गेले हे त्यांनी एकदा त्यांच्या सामनाच्या रोखठोक या सदरात लिहावे. राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "दगाबाज कोण? हे उद्धव ठाकरेंनी शपथ घेऊन सांगावे. २०१९ ला राज्याच्या जनतेने आम्हाला भरभरून मतदान केले. पण असे असतानाही असंगाशी संग करून आणि अनैसर्गिक यूती करून भाजपची साथ सोडून सत्ता स्थापन केली. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिली आणि आपल्या विरुद्ध विचारांशी संगत केली. त्यामुळे आता ते नैराश्यातून बोलत आहेत. भविष्यात राजकीय क्षेत्रात आपल्याला यश मिळेल की, नाही अशी भावना त्यांच्या मनात तयार झाली आहे," अशी टीकाही रावसाहेब दानवे यांनी केली आहे.