इस्लामाबाद : (Pakistan Balochistan Conflict) भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या अडचणीच प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येतेय. अशातच बलुच नेते मीर यार बलोच यांनी दि. १४ मे रोजी स्वातंत्र्याची घोषणा केली. याचदरम्यान बलुच अमेरिकन काँग्रेसचे सरचिटणीस रझाक बलुच यांनी एक स्फोटक खुलासा केल्याचे समोर येतंय. पाकिस्तानने बलुचिस्तानच्या ८०% पेक्षा जास्त भागावरील नियंत्रण गमावल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
हे वाचलंत का? : नक्षलवादविरोधी मोहीम गाजवणार्या ‘रोलो’चा मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू
रज्जाक बलोच यांनी पाकिस्तानी सैन्याला 'दहशतवादी सैन्य' म्हणत विधान केले की, पाकिस्तानी सैन्य रात्र झाली की, क्वेट्टामधून बाहेर पडण्यास घाबरते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही परिस्थिती स्वीकारली असून सुरक्षेच्या कारणास्तव सैन्य संध्याकाळी ५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करते आणि गस्तही घालत नाही. त्यामुळे पाकिस्तानने आपला आदर न गमावता सन्मानाने माघार घ्यावी आणि बांगलादेशसारख्या परिस्थितीची वाट पाहू नये, असे रज्जाक बलोच यांचे म्हणणे आहे.
मीर यार बलोच आणि रज्जाक बलोच या दोघांनीही भारत आणि संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. असे झाल्यास बलुचिस्तानचे दरवाजे नेहमीच खुले असतील, असा विश्वास त्यांनी दर्शविला.