मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये केलेल्या कामगिरीनंतर भारतीय जवानांना वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशात सिंदूर यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी शनिवार, दि. १७ मे रोजी याबाबत माहिती दिली.
भाजपच्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रदेश भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. चित्रा वाघ म्हणाल्या, "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख उत्तर दिले आहे. भारतीय स्त्रिच्या अस्तित्वावर झालेल्या हल्ल्याला हे न्यायपूर्ण उत्तर होते. भारतीय महिला सैन्य अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी जगाला या ऑपरेशन सिंदूरची माहिती सांगितली तेव्हा पाकिस्तानच्या मर्मावर हल्ला झाला. या माध्यमातून मोदीजींनी धर्मांध पाकिस्तान्यांना चपराक दिली."
"ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय संरक्षण दल आणि वायूदलातील महिलांची प्रभावी कामगिरी एक ऐतिहासिक क्रांती आणि नवभारताची ओळख म्हणून देशासमोर आली आहे. भारताच्या वीर सुपुत्रांनी आपल्या बहिणींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. भारतीय जवानांच्या शौर्य आणि सन्मानासाठी तसेच त्यांना वंदन करण्यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण देशात सिंदूर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही सिंदूर यात्रा निघणार असून यावेळी महिला सैनिकांना वंदन करण्यात येणार आहे. येत्या दि. २१ मे रोजी नांदेड येथे सिंदूर यात्रा होणार असून मी स्वत: तेथे जाणार आहे. तसेच बुधवार किंवा गुरुवारी मुंबईतसुद्धा ही सिंदूर यात्रा निघणार आहे. केवळ भाजपच्याच नाही तर सर्व स्तरातील महिला या यात्रेत सहभागी होतील," असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.