मुंबई : संजय राऊतांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे नाव बदलून 'नरकातला राऊत' असे ठेवायला हवे, असा खोचक सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. लवकरच संजय राऊतांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून त्याआधीच यावरून प्रचंड गदारोळ सुरु आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे नाव बदलण्याची गरज आहे. नरकातला स्वर्ग याऐवजी नरकातला राऊत असे नाव असायला हवे. हे नाव बदलण्यासाठी मी संजय राऊतांना पत्र लिहिणार आहे. या पुस्तकात त्यांनी स्वत:च्या राजकीय अध:पतानाचा लेखाजोखा मांडला आहे. तसेच ते किती दिशाहीन व्यक्ती आहे याचा उल्लेख या पुस्तकात आहे. नैतिक दिवाळखोरीची खरी कहानी राऊतांनी त्या पुस्तकात लिहीली आहे. त्यामुळे या पुस्तकाचे नाव बदलायला हवे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "पाकिस्तान दहशतवादी देश आहे हे जगाला कळण्यासाठी...!", शिष्टमंडळाच्या निर्णयावर काय म्हणाले मुख्यमंत्री?
राऊतांनी शिवसेना संपवली!
"एकेकाळी भाजप-शिवसेना यूती ही देशातील सर्वोत्तम यूती होती. या यूतीला न्याय देण्याचे काम हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यांनी हिंदूत्वाच्या आधारावर महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली. संजय राऊतांसारख्या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना संपवण्याचे काम केले. भाजपच्या हिंदूत्वाच्या मुद्यापासून फारकत घेऊन आणि काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंना बांधण्याचे काम राऊतांनी केले," अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊतांनी या पुस्तकात मोदींजींबद्दल लिहिले. परंतू, गोध्रा हत्याकांडात सुप्रीम कोर्टाने केलेल्या एसआयटीमध्ये २०१२ मध्येच मोदीजींना क्लिनचिट मिळाली होती. २०२२ मध्येही सुप्रीम कोर्टाने कोणतेही पुरावे नसल्याचे सांगत क्लिनचिट दिली होती. त्यावर आता संजय राऊत लिहित आहेत. म्हणूनच त्यांच्या पुस्तकाचे नाव बदलले पाहिजे. २०१० मध्ये अमित शाहांना अटक झाली हे देशाला माहिती आहे. पण २०१४ मध्ये कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले. मात्र, राऊत आम्ही मदत केली असे सांगतात."
हे पुस्तक आताच का आणले?
"महाविकास आघाडी फुटत असल्याने हे पुस्तक आणले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीला सोडत आहे. संजय राऊतांनी भाजपपासून शिवसेना तोडली आणि शिवसेनेचे अध:पतन केले. तेच संजय राऊत आता पुस्तक लिहून आपले कपडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी उध्वस्त झाल्यावर त्याला खरे गालबोट लागण्याचे कारण राऊत असतील," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.