महाविकास आघाडी वाचवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळांची मातोश्रीवर धाव! काय घडलं?
16-May-2025
Total Views |
मुंबई : आधी ठाकरे बंधू आणि आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना महाविकास आघाडीचे अस्तित्व संपूष्टात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडी वाचवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर धाव घेतली.
शुक्रवार, १६ मे रोजी हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "गेल्या तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांताध्यक्षपदाची जबाबदारी मी स्विकारली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि इंडीया आघाडीच्या मित्रपक्षांच्या नेतृत्वांना भेटणे ही माझी जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंसोबतच्या आजच्या भेटीत इंडीया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या अनुषंगाने एक चांगली चर्चा झाली. आपला महाराष्ट्र धर्म कसा असला पाहिजे? महाराष्ट्र धर्म जगला तर देश जगेल ही महाराष्ट्र धर्माची खासियत आहे. आज संघर्षाची वेळ आहे. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्याकरिता आगामी काळात दोन्ही पक्ष सोबत कसे राहतील? तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक संवाद करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर उद्धवजींची भेट झाली."
"राहूल गांधी यांच्या कार्यशैलीवर आधारित पुस्तक मी उद्धव ठाकरे यांना भेट दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा स्वरुपात लढाव्या याबाबत दोन्ही पक्षाच्या आपापल्या भूमिका आहेत. आम्ही आमचा सविनय निर्णय उद्धवजींना सांगितला आहे. लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगाने शिवसेनेशी काँग्रेसची बांधिलकी आहे. या विचारासोबत जे येतील त्यांचे स्वागत आहे," असेही ते म्हणाले.