रियाध : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी अरबचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी १४२ अब्ज डॉलर्सचा शस्त्रकरार केला आहे. हा करार अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार मानला जात आहे. या करारात हवाई, क्षेपणास्त्र संरक्षण, समुद्री सुरक्षा, अवकाश तंत्रज्ञान आणि संवाद प्रणाली यांचा समावेश आहे.
या करारानुसार, सौदी अरब अमेरिकेत ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे, ज्यात ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, पायाभूत सुविधा आणि विमानचालन क्षेत्रांचा समावेश आहे. सौदी कंपनी डेटा व्होल्ट अमेरिकेतील एआय केंद्रात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर, गुगल आणि ओरॅकल सारख्या अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांनी ८० अब्ज डॉलर्सच्या उपक्रमांची सौदी अरबमध्ये घोषणा केली आहे.
या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत एलोन मस्क, सॅम ऑल्टमन आणि गुगल, ऊबर इ. यांसारख्या कंपन्यांचे सीईओ उपस्थित होते. या भेटीत एआय आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देण्यात आला. या दौऱ्यात ट्रम्प सौदी अरबला "स्थैर्याचा आधारस्तंभ" म्हणाले त्याबरोबरच इराणपेक्षा सौदी अरबच्या वाढत्या विकासाचे कौतुक केले.
या करारा दरम्यान , सौदी अरबने लॉकहीड मार्टिनच्या F-35 स्टेल्थ फायटर जेट्सच्या खरेदीची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेने मात्र या संबधात कोणतीही प्रतिक्रीया दिल्याचे समजलेले नाही. या ऐतिहासिक करारामुळे अमेरिका आणि सौदी अरब यांच्यातील संरक्षण आणि आर्थिक संबंध अधिक घट्ट होतील, असे तज्ञांचे मत आहे.