जेरूसलेम : गाझातील खान युनूस शहरात इस्रायली लष्कराने एका युरोपियन रुग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायलने मंगळवार, ३ मे रोजी हा हल्ला केला. इस्रायली लढाऊ विमानांनी एकूण सहा बॉम्ब टाकले.
हे बॉम्ब रुग्णालयाच्या इमारतीवर टाकण्यात आले. हल्ल्यानंतर रुग्णालयाचा काही भाग जमीनदोस्त झाला. जमीनदोस्त झालेल्या भागाखाली अजूनही काही प्रमाणात नागरीक अडकल्याचीही भीती आहे. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मोहिम सुरक्षादल राबवत आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानूसार, रुग्णालयाच्या तळघरात हमासचे ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ होते. त्यामध्ये काही दहशतवादीकृत्य सुरू असण्याची कुणकुण लष्कराला लागली होती. म्हणूनच रुग्णालयावर हल्ला करण्यात आला, असे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. स्थानिकांनी आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालय एक सुरक्षित जागा असते. अशाप्रकारे रुग्णालयावर हल्ला करणे अयोग्य आहे. ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या या युद्धामुळे ५०,००० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या युद्धात अनेक रुग्णालये, शाळा आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत, असा आरोप गाझातील नागरीकांनी केला आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी पहिला हल्ला गाझातील पॅलेस्टीनच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या नागरिकांवर केला होता. ज्यात एकूण १४४३ जण क्रूरतेने मारले गेले. अनेक स्त्रियांचे बलात्कार करुन त्यांचे मृतदेह विवस्त्र फेकून दिले होते. यानंतर इस्त्रायलने पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध पुकारत गाझातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निर्धार केला होता.
इस्त्रायलच्या टार्गेटवर रुग्णालयेच का आहेत?
पॅलेस्टाईनमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांनी आपली मुख्यालये ही रुग्णालयांच्या तळाशी बंकरमध्ये थाटली आहेत. रुग्णालयांवर सहसा शत्रू राष्ट्र हल्ला करणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, इस्त्रयालने पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या आघाडीत साम, दाम, दंड आणि भेद हे तंत्र वापरल्याने आता दहशतवादीकृत्य करणाऱ्यांना थाराच नाही, असा इशारा दिला आहे. सर्वात आधी रुग्णालयांखाली बंकरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना हुसकावा, असा इशारा इस्त्रायलने पॅलेस्टाईनला दिला आहे.