पुणे : अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी धनुष्यबाण हाती घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
याप्रसंगी आमदार शरद सोनावणे, आमदार विजय शिवतारे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे तसेच शिवसेनेचे पुणे ग्रामीण पट्ट्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे, बाबू पाटे, देवराम लांडे, पंकज कणसे, प्रसन्ना डोके, जीवन शिंदे, संगीता वाघ, अलका फुलपगार यांच्यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील उबाठा गटातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
हे वाचलंत का? - आर्थिक साक्षरतेकडून आर्थिक सक्षमीकरणाकडे महिलांचा प्रवास! महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "अडीच वर्षांपूर्वी तुम्ही शिवसेना गहाण टाकण्याचे आणि वंदनीय बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप केले. ते पाप धुवण्यासाठी मी प्रयागराजला गेलो होतो. अडीच वर्ष माझ्यावर फक्त टीका केली आणि अजूनही टीकाच करत आहेत. पण मी त्यांच्या टीकेला कामातून उत्तर देतो. गुवाहाटीला गेलेल्या महिला आमदारांवरही त्यांनी खालच्या शब्दात टीका केली. महाकुंभात ६५ कोटी लोकांनी स्नान केले. मात्र, मी गेलो असताना त्यावर त्यांनी टीका केली. तुम्ही शिवसेना गहाण टाकण्याचे जे पाप केले ते धुण्यासाठी प्रयागराजला गेलो होतो. माझ्यावर विश्वास ठेवून आज राज्यभरातले हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. परंतू, ते तुमच्याकडून का जात आहेत याचा विचार करावा," असा टोला त्यांनी उबाठा गटाला लगावला.