नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीपीएस’ या संस्थेच्या अहवालामधून, एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये केरळ राज्यातील मुस्लीम समुदायामधील जन्मदर हा कमालीचा वाढलेला असून, हिंदू आणि ख्रिश्चनांचा जन्मदर सातत्याने घटत आहे. तसेच मृत्युदरामध्येही मुस्लीम धर्मीयांचा दर हा हिंदू आणि ख्रिश्चन यांच्यापेक्षा कमीच आहे.
सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज’ अर्थात ‘सीपीएस’ या थिंक टँकने, दि. ३० जानेवारी २०२५ रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचे नाव आहे, ‘भारतातील धार्मिक लोकसंख्याशास्त्र: वाढते धार्मिक असंतुलन.’ या अहवालात २००८ ते २०२१ सालापर्यंत, केरळमधील हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर समुदायांच्या डेटावर संशोधन करण्यात आले आहे. या अहवालात नवीन जन्म, मृत्यू आणि या समुदायांमधील लोकसंख्येवर त्यांचा होणारा परिणाम, याबद्दल चर्चा केली आहे. अहवालात असे आढळून आले की, अलीकडच्या काळात केरळमधील मुस्लीम लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. केरळमध्ये हिंदूं लोकसंख्येच्या अधार्र् असलेला मुस्लीम समुदाय, सर्वाधिक मुले जन्माला घालत असून, हाच ट्रेंड अजूनही सुरूच आहे. केरळमध्ये जन्माला येणारी, सुमारे ४४ टक्के मुले मुस्लीम आहेत. हिंदूंची लोकसंख्या दुप्पट असूनही, मुले जन्माला घालणार्या लोकांचे प्रमाण सुमारे ४१ टक्केच आहे. दुसरीकडे, मुस्लिमांमध्ये मृत्यूची संख्याही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. दरवर्षी लाखो नवीन बालकांच्या जन्मामुळे, मुस्लीम समुदायात वाढ होताना दिसत असल्याचेही, या अहवालामधून समोर आले आहे.
‘सीपीएस’च्या विश्लेषणात असे आढळून आले की, २०१६ सालापासून केरळमधील मुस्लीम समुदायात सर्वाधिक मुले जन्माला येत आहेत. २०१६ साली केरळमध्ये दोन लाख, सात हजार हिंदू मुले जन्माला आली. तर याच काळात, २ लाख, ११ हजार मुस्लीम मुले जन्माला आली. २०१७ मध्येही अशीच परिस्थिती होती. तेव्हा २ लाख, १० हजार, ७१ हिंदू मुले जन्माला आली होती. परंतु, मुस्लीम मुलांची संख्या २ लाख, १६ हजार, ५२५ होती. हा ट्रेंड २०२० सालापर्यंत चालू राहिला. २०२१ सालचे हे एकमेव वर्ष होते जेव्हा, हिंदू मुलांची संख्या वाढली होती. २०१६ सालापासून केरळमध्ये, हिंदूंचा जन्मदर सातत्याने कमी होत आहे. राज्यात हिंदू लोकसंख्या सुमारे ५५ टक्के आणि मुस्लीम लोकसंख्या अंदाजे २७ टक्के असतानाही हे घडत आहे. जर दोन्ही आकडे एकत्र केले आणि त्याचा सखोल तुलनात्मक अभ्यास केला तर हे स्पष्ट होते की, अर्धी लोकसंख्या असूनही, मुस्लीम हिंदूंपेक्षा जास्त मुले जन्माला घालत आहेत. २०१६ सालापूर्वी जेव्हा हिंदू मुलांची संख्या सतत कमी होत होती, तेव्हा हा बदल हळूहळू होत होता. अहवालामध्ये २००८ सालापासूनच्या आकडेवारीचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, २००८ साली केरळमध्ये जन्मलेल्या बालकांपैकी, ४५ टक्के हिंदू होते, तर ३६ टक्के मुस्लीम होते. ख्रिश्चनांची संख्या अंदाजे १७.५ टक्के होती. परंतु, २०२० सालापर्यंत, एकूण जन्मदरामध्ये हिंदू बालकांचा वाटा ४१.४ टक्क्यांपर्यंत कमी झाला, तर त्याच काळात एकूण जन्मदरामध्ये मुस्लीम बालकांचा वाटा ४४ टक्क्यांपर्यंत वाढला. याच काळात, जन्मलेल्या एकूण बालकांमध्ये ख्रिश्चनांचा वाटा सुमारे, १८ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचेही आढळून आले आहे.
‘सीपीएस’ अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या तीन दशकात केरळमध्ये, एकूण प्रजनन दरात अर्थात टीएफआरमध्येही मोठी घट झाली आहे. १५-४९ वयोगटातील एका महिलेने जन्म दिलेल्या बालकांची संख्या, ‘टीएफआर’ म्हणून ओळखली जाते. त्याची सरासरी हाच राज्याचा ‘टीएफआर’ असतो. कोणत्याही समुदायाची लोकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी, सरासरी ‘टीएफआर’ २.१ असावा लागतो. २०२३ सालच्या सर्वेक्षणानुसार, केरळमध्ये मुस्लिमांचा ‘टीएफआर’ अजूनही २.२५ आहे, तर हिंदूंमध्ये तो १.५३ वर पोहोचला आहे. ‘सीपीएस’ अहवालातून असे दिसून आले आहे की, या सर्व बदलांचा राज्याच्या लोकसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. ‘सीपीएस’ला असे आढळून आले आहे की, १९५० सालापासून केरळमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या, सर्वात वेगाने वाढत आहे. २००१ ते २०११ दरम्यान, केरळमध्ये हिंदू लोकसंख्या केवळ २.२३ टक्के आणि ख्रिश्चन लोकसंख्या केवळ १.३८ टक्क्यांनी वाढली. याच काळात मुस्लीम लोकसंख्या १२.८ टक्के वाढली. हा ट्रेंड याआधीही चालू होता.
विश्लेषणात ‘सीपीएस’ला असेही आढळले आहे की, २००८-२१ सालच्या दरम्यान जन्मलेल्या बालकांमध्ये, मुस्लिमांचा वाटा त्यांच्या लोकसंख्येपेक्षा खूपच जास्त आहे. परंतु, राज्यातील मृत्यूंमध्ये त्यांचा वाटा त्यांच्या लोकसंख्येपेक्षाही कमी आहे. ‘सीपीएस’ अहवालात असे दिसून आले आहे की, २००८ ते २०२१ दरम्यान केरळमध्ये मृत्युमुखी पडणार्या मुस्लिमांचा वाटा सुमारे २० टक्के होता, जो त्यांच्या २६.५ टक्के लोकसंख्येपेक्षा खूपच कमी आहे. उलटपक्षी, मृत्यूंमध्ये हिंदूंचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे. ख्रिश्चनांमध्येही त्यांच्या लोकसंख्येनुसार, मृत्यूची संख्या समान राहिली आहे. अहवालातून असेही दिसून आले आहे की, दरवर्षी केरळच्या लोकसंख्येपैकी सर्वाधिक लोक मुस्लीम समुदायात सामील होत आहेत. केरळमधील प्रत्येक समुदायात दरवर्षीचे जन्म आणि मृत्यू यांचा बालकांमधील फरक मोजून, ‘सीपीएस’ने हा डेटा तयार केला आहे. ‘सीपीएस’नुसार, २०२१ साली एक लाख, चार हजार नवीन लोक मुस्लीम समुदायात सामील झाले आहेत. याचकाळात हिंदूंची लोकसंख्या केवळ १ हजार, ०९९ संख्येने वाढली आहे. ख्रिश्चन लोकसंख्येत तर ६ हजार, २१८ संख्येने घट झाली आहे.
अहवालानुसार, हिंदूंच्या लोकसंख्येतील वाढीचे प्रमाण सतत कमी होत आहे. जर हाच कल सुरु राहिला, तर काही वर्षांत हिंदू लोकसंख्या कमी होऊ लागेल. तथापि, २००८ सालापासून दरवर्षी मुस्लीम लोकसंख्येत एक लाखांहून अधिक लोकांची भर पडत आहे. अहवालात असे दिसून आले आहे की, २०११-२० सालच्या दरम्यान लोकसंख्येतील त्यांचा वाटा २६ टक्क्यांवरून, २९ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. त्याचवेळी, केरळच्या लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा कमी होत आहे. येत्या काळात ही तफावत वाढतच राहू शकते, असे अहवालात म्हटले आहे, जी निश्चितच चिंताजनक बाब म्हणावी लागेल.