मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Swaranad Sangam RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्य भारत प्रांत, भोपाळच्या वतीने रविवार, दि. ०२ जानेवारी रोजी मित्तल कॉलेज कॅम्पसमध्ये 'स्वरनाद संगम' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ११० स्वयंसेवकांनी आपल्या वादनातून मनमोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमास अखिल भारतीय शारीरिक शिक्षण प्रमुख जगदीश प्रसाद उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध बासरी वादक अभय फगरे होते. कार्यक्रमाची सुरुवात 'श्री राम, शिवरंजनी, माँ तुझे सलाम, ए मेरे प्यारे वतन…' अशा सुमधुर रचनांच्या सादरीकरणाने झाली.
तब्बल ४५ वर्षांनी अशा कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय फगरे यांनी सांगितले. आपल्या सांगितिक प्रवासाची सुरुवातही घोष कार्यक्रमातून झाल्याचे त्यांनी सांगितले. प.पू.श्री.गोळवलकर गुरुजींसमोर सादरीकरण करण्याची संधी त्यांनी मिळाल्याचेही अभय फगरे यांनी सांगितले.
अ.भा.शारीरिक शिक्षण प्रमुख जगदीश प्रसाद म्हणाले, संघाची स्थापना सन १९२५ मध्ये झाली असली तरी पथसंचलनास १९२६ पासून खरी सुरुवात झाली. एवढेच नाही तर संघाने १९२७ मध्ये पहिल्यांदा शंख खरेदी केला होता. संघाने तयार केलेल्या ४२ रचनांचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आणि त्याचे सादरीकरण सुरू झाले ही संघासाठी अभिमानाची बाब आहे. नुकतीच केरळमधील पोलिसांच्या पासिंग आऊट परेडमध्ये सादर करण्यात आलेली रचनाही स्वयंसेवकांनी तयार केली होती. एवढेच नाही तर १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात नौदलाने संघाची रचनाही सादर केली होती.