मुंबई : शासकीय, महानगरपालिका रूग्णालयांसह खासगी रूग्णालय परिसरांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून 'विशेष स्वच्छता मोहीम' राबवण्यात येणार आहे. दिनांक ३ मार्च २०२५ पासून या अभियानाला सुरुवात होणार असून १५ दिवसांचे हे व्यापक अभियान असेल.
महानगरपालिकेने रूग्णालयांच्या स्वच्छतेचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी लोकसहभागातून 'विशेष स्वच्छता मोहीम' हाती घेतली आहे. याद्वारे शासकीय तसेच महानगरपालिका रूग्णालयांसह खासगी रूग्णालय परिसरांमध्येही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. यासोबतच त्यात २४ प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) सार्वजनिक आरोग्य केंद्राचाही समावेश असेल. येत्या ३ मार्च रोजी या मोहिमेचा शुभारंभ होणार असून पुढील पंधरा दिवस म्हणजेच १७ मार्चपर्यंत ही मोहिम सुरु राहिल.
हे वाचलंत का? - माजी आमदार मोहन हंबर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १ असे दोन तास सर्व रुग्णालयांमध्ये ही मोहिम राबवण्यात येणार आहे. यामध्ये महानगरपालिका कामगार-कर्मचारी, रुग्णालय प्रशासन यांसह स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण सहकारी संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिक यांचा सहभाग राहणार आहे. स्वच्छतेची सातत्यपूर्ण अंमलबजावणी, योग्य कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
असे असेल स्वच्छतेचे नियोजन
उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग रुग्णालय प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छता करण्याची ठिकाणे निश्चित करेल. या आधारे १५ दिवसीय उपक्रमाची आखणी केली जाईल. स्वच्छता मोहिमेदरम्यान रुग्णालय परिसर, लगतचे पदपथ तसेच वाहनतळांची स्वच्छता केली जाईल. महानगरपालिका कामगार-कर्मचारी घनकचऱ्याचे संकलन करतील आणि योग्य पद्धतीने त्याची विल्हेवाट लावतील. मुंबईकर नागरिक, स्वयंसेवक आणि विविध स्वयंसेवी संस्था, नागरी संघटनांनी रूग्णालय परिसरांमधील विशेष स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिघावकर यांनी केले आहे.