'भारतीय किसान संघ'च्या अधिवेशनात दोन महत्त्वाचे ठराव पारित!

24 Feb 2025 16:37:35

Bharatiya Kisan Sangh Gujarat Adhiveshan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bharatiya Kisan Sangh Gujarat Adhiveshan)
गुजरातच्या पालनपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय किसान संघच्या तीन दिवसीय अधिवेशनात ‘सेंद्रिय शेती एक जबाबदारी’ आणि ‘सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी कृषी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन’ असे दोन ठराव पारित करण्यात आले. ज्यामध्ये देशभरातील सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी आवाहन केले. दुसऱ्या प्रस्तावात धोरणांमध्ये सुधारणा आणि बदल करून कृषी उत्पादन, मूल्यवर्धन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन, वाणिज्य, लघु कुटीर, ग्रामोद्योग, हस्तकला आणि ग्राम स्वावलंबनाचा विचार या परिमाणे बळकट करण्याचे म्हटले आहे. जेणेकरून देशातील गावांना समृद्ध जीवन जगता येईल.

हे वाचलंत का? : पंचपरिवर्तन ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची गुरुकिल्ली : डॉ. मोहनजी भागवत

भारतीय किसान संघच्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या सदस्यसंख्येनुसार ६० हजार गावांमध्ये किसान संघाच्या सक्रिय गाव समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या गाव समित्यांच्या माध्यमातून देशभरातील ४२ लाख शेतकऱ्यांना भारतीय किसान संघाचे सदस्य बनवण्यात आले आहे. भारतीय किसान संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय परिषदेत नऊ सत्रे झाली. ज्यामध्ये विविध प्रांतातून आलेले अध्यक्ष व महामंत्री यांनी आपापल्या राज्यात किसान संघतर्फे राबविण्यात येत असलेले संघटनात्मक, आंदोलनात्मक व रचनात्मक कार्यक्रम आपापल्या प्रादेशिक भाषेत मांडले.

संमेलनाच्या समारोप सत्रात अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी म्हणाले की, २०४७ च्या विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी गौ-शेती-व्यापारासोबतच शेतीपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पुढे जाण्याची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती ही सर्वात मोठी भूमिका बजावते, त्यामुळे सर्वांगीण विकसित भारत घडवण्याची मोठी जबाबदारी कृषी आणि शेतकऱ्यांची आहे.


Bharatiya Kisan Sangh Gujarat Adhiveshan

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी म्हणाले की, देशाच्या हितामध्ये शेतकऱ्यांचे हित अग्रस्थानी आहे. भाषावाद, जातिवाद, प्रांतवाद यापासून आपण दूर आहोत कारण आपण भारत माता की जय म्हणतो. पुढील तीन वर्षांचा रोडमॅप तयार करून शेतकरी संघटनेला काम करावे लागणार आहे.

अखिल भारतीय अध्यक्ष आणि महामंत्री यांची निवड
'भारतीय किसान संघ'च्या १४ व्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय किसान संघचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि महामंत्री यांची निवड करण्यात आली. देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनी तेलंगणाच्या के. साई रेड्डी यांची अखिल भारतीय अध्यक्षपदी तर ओरिसाच्या मोहिनी मोहन मिश्रा यांची अखिल भारतीय महामंत्री म्हणून निवड केली.

अध्यक्ष आणि महामंत्री यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून टी पेरुमल, राम भरोस वासोटिया, विशाल चंद्राकर, सुशीला विश्नोई यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मंत्री म्हणून बाबूभाई पटेल, डॉ. सोमदेव शर्मा, भानू थापा, वीणा सतीश, खजिनदार युगल किशोर मिश्रा; संघटन मंत्री म्हणून दिनेश कुलकर्णी, सहसंघटन मंत्री म्हणून गजेंद्र सिंह, जैविक प्रमुख म्हणून नाना आखरे, महिला संयोजिका म्हणून मंजू दीक्षित, कार्यालय प्रमुख म्हणून चंद्रशेखर जी, अखिल भारतीय प्रचारक म्हणून राघवेंद्र सिंह पटेल यांचे नाव घोषित करण्यात आले.

महिला शेतकऱ्यांची उपस्थिती
शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात महिला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती चर्चेत होती. देशभरातील विविध प्रांतातील महिला शेतकरी आपापल्या प्रांतातील खास वेशभूषेत उपस्थित होत्या. गायींवर आधारित नैसर्गिक शेतीसाठी महिला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर मिरवणुकीचे नेतृत्व केले.

Powered By Sangraha 9.0