पंचपरिवर्तन ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची गुरुकिल्ली : डॉ. मोहनजी भागवत
24-Feb-2025
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mohanji Bhagwat Speech at Guwahati) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गुवाहाटी महानगर आयोजित कार्यकर्ता बौद्धिक वर्ग नुकताच गुवाहाटीच्या साऊथ पॉइंट स्कूल कॅम्पस, बरशापारा येथे संपन्न झाला. एक हजार स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी पंचपरिवर्तन ही सामाजिक परिवर्तनाची महत्त्वाची गुरुकिल्ली असल्याचे अधोरेखित केले.
सामाजिक समरसता, कौटुंबिक मूल्ये, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या समाजासाठी आवश्यक असलेल्या पाच बदलांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. समरस समाजाची निर्मिती करता येईल, या अनुशंगाने त्यांनी समाजातील विविध जाती, पंथ, प्रांत, भाषा यांच्यात मैत्री आणि एकता वाढविण्यावर त्यांनी भर दिला. कुटुंबात भारतीय मूल्यांचा प्रसार केल्यास समाजाला योग्य दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग मिळेल, असेही ते म्हणाले.
सरसंघचालकांनी जलसंवर्धन, पॉलिथिनचा कमी वापर आणि वृक्ष लागवड यासारख्या उपक्रमांना महत्त्व देत पर्यावरण रक्षणातील समाजाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. ते म्हणाले, प्रत्येक भारतीय कुटुंबाने आपली भाषा, कपडे, भोजन, निवास आणि प्रवास यामध्ये स्वदेशीचा अवलंब केला पाहिजे. प्रत्येकाने परदेशी भाषांचा वापर कमी करून मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. जोपर्यंत नागरी कर्तव्यांचा संबंध आहे, आपण सर्व सरकारी नियम आणि कायद्यांचे पालन केले पाहिजे, त्याचबरोबर पारंपारिक सामाजिक नैतिक नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ज्याचा उल्लेख कोणत्याही नागरी नियमाच्या पुस्तकात नाही, जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल.