बनावट आधारकार्ड सादर करत १०० घुसखोरांनी मिळवले जन्म प्रमाणपत्र!

21 Feb 2025 14:09:45
 
Kirit Somaiyya Malegaon Birth Certificate Scam
 
मुंबई : मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी १०० घुसखोर अर्जदारांनी कोणतेही प्रमाणपत्र सादर न करता जन्म प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उघड झाली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी या १०० जणांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली. तसेच याप्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे देऊन त्यांना ताबडतोब त्यांच्या देशात परत पाठवून देण्याची मागणी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा अनोखा उपक्रम! शिवाजी पार्क मैदानावर भरवणार भव्य पुस्तक प्रदर्शन
 
भारतात जन्म झाल्याचे कोणतेही प्रमाणपत्र किंवा कागदपत्र नसताना मालेगाव येथील १०० घुसखोर अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले आहे. यातील काही अर्जासोबत फक्त आधारकार्ड आहे, तर काही अर्जांसोबत आधारकार्ड आणि रेशनकार्डची फोटोप्रत जोडण्यात आली आहे. परंतू, रेशनकार्ड हे फक्त धान्य मिळवण्याचे टोकन असून त्याला कोणत्याही प्रकारचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, तसेच आधारकार्ड म्हणजे केवळ व्यक्तीची ओळख देणारा नंबर असून त्याला महत्वाच्या कामासाठी पुरावा धरता येणार नाही, असे यापूर्वीच राज्य सरकारने स्पष्ट केले असल्याचे किरीट सोमय्यांनी आपल्या पत्रात सांगितले.
 
मात्र, या १०० अर्जदारांकडे भारतीयत्वाचा कोणताही पुरावा नसताना तहसीलदारांनी त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले असून हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांनी या अर्जाला मान्यता दिली त्यांच्यावर कारवाई करावी. या १०० लोकांपैकी ज्यांच्याकडे भारतीय असल्याचा कोणताही पुरावा नाही त्यांची विचारपूस करून कारवाई करावी. तसेच हे १०० लोकांचे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0