मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेचा अनोखा उपक्रम! शिवाजी पार्क मैदानावर भरवणार भव्य पुस्तक प्रदर्शन
21-Feb-2025
Total Views |
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर भव्य अभिजात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार असून अनेक दिग्गज मंडळी कविता वाचन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
येत्या २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मनसे एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवणार आहे. हे पुस्तक प्रदर्शन चार दिवस म्हणजे २ मार्च २०२५ पर्यंत असेल. महाराष्ट्रातील सर्व नामांकित प्रकाशक या प्रदर्शनात त्यांची पुस्तके घेऊन येणार आहेत.
याबाबत माहिती देताना राज ठाकरे म्हणाले की, "या प्रदर्शनाचे औपचारिक उदघाट्न झाल्यावर काही मान्यवरांना बोलावून त्यांच्या आवडीची एक कविता त्यांनी म्हणावी असा विचार डोक्यात आला. जवळपास १७ मान्यवरांशी मी बोललो आणि प्रत्येकाने आनंदाने या कल्पनेला होकार दिला आहे. इतक्या मान्यवरांच्या मुखातून मराठी कविता ऐकणे हा एक अनुभव असेल तो प्रत्यक्ष अनुभवायला सर्वांनी यावे," असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जेष्ठ गायिका आशा भोसले, जावेद अख्तर, अभिनेते अशोक सराफ, सोनाली बेंद्रे, विकी कौशल, आशुतोष गोवारीकर, अभिजात जोशी, रितेश देशमुख, महेश मांजरेकर, शर्वरी वाघ, नागराज मंजुळे, लक्ष्मण उतेकर हे मान्यवर कविता वाचन करणार आहेत.
मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा!
"मराठी भाषेत किती अफाट साहित्य आणि त्यातून विचार निर्माण झाला आहे हे पुढच्या पिढयांना कळायलाच हवे. मराठी उत्तम साहित्याची भाषा होतीच आणि ती परंपरा सुरु आहे. पण मराठी ही आता ज्ञानची भाषादेखील व्हायला लागली आहे. जगभरातील अनेक उत्तमोत्तम पुस्तके मराठीत येत आहेत, ज्यातून बदलत्या जगाचे भान येणे सहज शक्य आहे. हे आत्ताच पुढच्या पिढ्यांच्या मनात रुजवावे लागेल. हे घडल्यास अजून ताकदीने लेखक, विचारवंत या भूमीत निर्माण होतील. मराठी माणसात वैश्विक दृष्टिकोन निर्माण व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे, पण त्यासाठीची खिडकी ही मराठीची असावी. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करत आहोत," असे म्हणत राज ठाकरे यांनी सर्वांना पुस्तक प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन केले आहे.