मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ तासांत बुलढाण्यातून या दोघांना अटक केली असून त्यांना तातडीने मुंबईत आणणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईतील अनेक पोलिस स्टेशनमध्ये शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी २४ तासांत ही धमकी देणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मंगेळ वायाळ आणि अभय शिंगणे असे या दोघांचे नाव असून ते बुलढाण्यातील देऊळगाव येथील रहिवासी आहेत.
धमकी देण्याचे नेमके कारण काय होते? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी विदर्भ दौऱ्यावर आहेत. या धमकीच्या पार्श्वभूमिवर त्यांची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.