मुंबई : शरद पवार आणि आमच्यात रुसवा नाही पण आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.
शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिल्याने संजय राऊतांनी जळफळाट करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता शुक्रवार, २० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार आणि संजय राऊत हे दोघेही एकाच मंचावर येणार आहेत.
हे वाचलंत का? - आईशप्पथ सांगतो, एकदा का हे स्मारक बनलं की,...! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
याबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार आणि माझ्यात अजिबात रुसवा फुगवा नाही. एका विषयात आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली महादजी शिंदे यांच्या नावाने एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिला गेला. पण हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तर खाजगी कार्यक्रम होता. त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला आणि पवार साहेबांसारख्या नेत्याला अंधारात ठेवले गेले. नाराजी व्यक्त करणे ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचे एखाद्या व्यक्तीविषयी टोकाचे मत आहे. आमच्या तीव्र भावना आहेत. आम्ही आमचे मत मांडले. शरद पवार यांची भूमिका वेगळी असेल. आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे ते म्हणाले.