आईशप्पथ सांगतो, एकदा का हे स्मारक बनलं की,...! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
आग्रा येथे छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार
20-Feb-2025
Total Views |
लखनौ : छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे ज्या कोठीत ठेवण्यात आले होते त्याठिकाणी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी केली.
आग्रा येथे ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री एस पी बघेल, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल. तसेच याबाबत आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहे. आईशप्पथ सांगतो की, एकदा हे स्मारक बनले की, ताजमहालपेक्षाही जास्त लोक हे स्मारक बघण्यासाठी येतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते!
"छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी आहे. या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. राजमाता जिजाऊंनी परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा महाराजांना दिली. स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासक आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते. महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी जागे करून समाजातील विविध छोट्या घटकांना, बारा बलुतेदार जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. ते देव, देश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्यामुळे जगात आदर्श असे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. देशाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे," असे त्यांनी सांगितले.