मुंबई : विलेपार्ल्यात निर्णय घेणारे राऊत आणि अनिल परब कोण? असा सवाल जितेंद्र जनावळे यांनी केला आहे. उबाठा गटाचे विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांनी अनिल परब यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजीनाम्यापूर्वी जितेंद्र जनावळे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. यात त्यांनी अनिल परबांची तक्रारही केली. "विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझी राजकीय कोंडी करण्याचे षडयंत्र रचले गेले. गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी आणि घर सोडून भाजपच्या विरोधात जोमाने लढलो. पण विभागप्रमुख अनिल परब यांनी मला शेजारच्या विधानसभा क्षेत्रात म्हणजे बाहेर ठेवले. वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांनी फक्त तारखा दिल्या आणि निराशा केली," असे त्यांनी या पत्रात म्हटले.
हे वाचलंत का? - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीआधी ठाकरेंना धक्का! पाच नगरसेवक 'जय महाराष्ट्र' करणार
त्यानंतर त्यांना तडकाफडकी मातोश्रीवर बोलवण्यात आले असून त्यांनी उद्धव ठाकरेंकडे अनिल परब यांची तक्रार केल्याची माहिती आहे. दरम्यान, विलेपार्ल्यात निर्णय घेणारे संजय राऊत आणि अनिल परब साहेब कोण? असा सवाल त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.