२६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार! तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

14 Feb 2025 14:32:17
 
Fadanvis
 
नवी दिल्ली : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याला अमेरिकेने परवानगी दिली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार असल्याचे ते म्हणाले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा पाकिस्तानी दहशतवादी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्यासाठी अमेरिकेने होकार दिला असून ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यासाठी अमेरिका प्रशासनाला तयार केले. मागच्या काळात आम्ही तहव्वूर राणाची ऑनलाईन साक्ष मिळवली. त्यामुळे यात पाकिस्तानचा हात असल्याचे आपण दाखवू शकलो. पण त्यावेळी तो आमच्या सुरक्षेत असल्याने आम्ही त्याला देणार नाही, असे अमेरिकेने सांगितले होते. मात्र, तो भारताला अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान मोदींनी रेटली. त्यामुळे तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली असून आता २६/११ च्या हल्ल्याला अंतिम न्याय मिळणार आहे."
 
हे वाचलंत का? -  भविष्यात दुपारी जेवण काय करायचे? याबाबतचे आदेशही उबाठाच्या खासदारांना येतील
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन नवीन कायद्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली. राज्यांमध्ये या कायद्यांची अंमलबजावणी कशी झाली आणि या कायद्यांअंतर्गत आतापर्यंत किती केसेस दाखल झाल्या आहेत, यासाठी ही बैठक होती. महाराष्ट्रात या तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे सुरु केली आहे. याबाबत आम्ही सगळी माहिती दिली. ही बैठक अतिशय चांगली झाली असून आम्हाला यातून चांगले मार्गदर्शन मिळाले. हे तिन्ही कायदे लागू करण्याबाबत आम्ही अधिक वेगाने काम करू," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0