मुंबई : मनातील भीतीवर विजय मिळवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी केले. दादर येथे आयोजित परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी केलेल्या संवादातून आपल्यालासुद्धा अनेक चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या असतील. या कार्यक्रमाचे नाव परीक्षा पे चर्चा असे असले तरी विद्यार्थी जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा, याबाबत पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला खूप चांगले अनुभव दिले. पंतप्रधान मोदी हे अत्यंत गरीबीतून वर आले आहेत. जीवनात अनेक संघर्ष करून आपल्या मेहनतीने ते पुढे आलेत. त्यांनी ज्याप्रकारे आपला देश बदलला ते आपण बघितले. त्यांच्या या अनुभवातून आपल्यालासुद्धा जीवनाचे ज्ञान मिळावे, हा यामागचा उद्देश आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट!
ते पुढे म्हणाले की, "जगात सर्वांसमोरच आव्हाने असतातच. पण त्यांना सामोरे जाताना आपल्यात सकारात्मकता असली पाहिजे, असा मंत्री पंतप्रधान मोदींनी दिला असून तो अत्यंत महत्वाचा आहे. तसेच इतरांशी स्पर्धा न करता स्वत:शीच स्पर्धा करा, असाही मंत्र त्यांनी दिला आहे. अशी स्पर्धा केल्यास मनातली भीती निघून जाते. आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा विजय आपण मिळवू शकलो तर जीवनात कुठल्याच गोष्टी आपल्याला विचलित करू शकत नाही," असा मोलाचा सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला.
प्रत्येकामध्ये असामान्य होण्याची क्षमता!
"जी माणसे असामान्य दिसतात ती जीवनात सामान्यच असतात. पण सामान्य माणसाने काम करत असताना असामान्य काम केल्यावर तो असामान्य होतो. आपल्या प्रत्येकामध्ये असामान्य होण्याची क्षमता आहे. ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याकडे जाता आले पाहिजे," असेही ते म्हणाले.