मुंबई : (BMC Election) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी भाजपच्या उमेदवारांनी शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. घाटकोपर वॉर्ड क्रमांक १३० मधून धर्मेश गिरी, वॉर्ड क्रमांक १३१ मधून राखी जाधव आणि वॉर्ड क्रमांक १३२ मधून रितू तावडे यांनी आपले अर्ज सादर केले. अर्ज दाखल करताना संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. (BMC Election)
हेही वाचा : भाजप-शिवसेनेचे जागावाटप निश्चित; भाजप १३७ तर शिवसेना ९० जागांवर लढणार
“माझ्या मतदारसंघात आजपर्यंत आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. मात्र मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सध्या झपाट्याने विकासकामे होत आहेत, तशीच कामे माझ्या मतदारसंघात होणे अपेक्षित आहे. ही सर्व नागरी सुविधांची कामे करण्याची संधी मला भाजपने दिली आहे. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचा आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळत असून, तो आमच्या यशातून सर्वांना पाहायला मिळेल.”
राखी जाधव, भाजप उमेदवार (प्रभाग क्र. १३१)
“पक्षाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे, त्यामुळे मी नक्कीच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. तसेच पक्षाने एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिल्याने लोकांनाही खूप आनंद झाला आहे”
धर्मेश गिरी, भाजप उमेदवार (प्रभाग क्र. १३०)
“मुंबई महापालिकेशी निगडित लोकांच्या कोणत्याही समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेन. तसेच आमच्या वॉर्डातील सर्वात मोठी समस्या असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचाही मी नक्कीच प्रयत्न करेन.”
रितू तावडे, भाजप उमेदवार (प्रभाग क्र. १३२)