मुंबई : ( BJP-Shiv Sena Seat Sharing Finalized ) मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले असून सोमवारी रात्री उशीरा हे जागावाटप जाहीर करण्यात आले. यानुसार भाजप १३७ तर शिवसेना ९० जागा लढवणार आहे. यामध्ये महायुतीचे इतर घटकपक्षही समाविष्ट असतील. सोमवारी, दिवसभर भाजप आणि शिवसेनेने काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. त्यानुसार, त्यांनी आपापले अर्ज दाखल केले. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत जागावाटपांवर दोन्ही पक्षांमध्ये बैठका सुरु होत्या. या बैठकीत एकमत झाल्यानंतर हे जागावाटप जाहीर करण्यात आले. मंगळवारी एबी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असून सर्व पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
भाजप-शिवसेना कुठे एकत्र आणि कुठे स्वतंत्र?
मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, पनवेल, नागपूर आणि जळगाव याठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असून ते एकत्रितपणे निवडणूकांना सामोरे जाणार आहेत. तर, पुणे, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, सांगली, जालना, धुळे याठिकाणी भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढणार आहेत.
"मुंबईत भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागांवर लढणार असून यात इतर घटक पक्षाचा समावेश असेल. येणाऱ्या काळात एकत्रितपणे प्रचाराचा शुभारंभ केला जाईल आणि मुंबई महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा, महायुतीचा भगवा झेंडा फडकेल. महापालिकेवर मुंबईकरांचा महापौर विराजमान व्हावा, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राहावी आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव झाला पाहिजे. आता मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छिणाऱ्या एका नवीन मामुंच्या टोळीला घरी पाठवण्याचे काम महायुती करेल."
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....