प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने अर्णव महर्षी यांचा सन्मान

27 Dec 2025 15:14:16
Arnav Mahirshi
 
मुंबई : ( Arnav Mahirshi ) नवी दिल्ली येथे वीरबाल दिवसाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात देशभरातील २० बालकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या बालकांचा यावेळी गौरव करण्यात आला. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षी यांची निवड करण्यात आली आहे.
 
पुरस्कार वितरणप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ही बालके भारताच्या अमृतपिढीचे खरे प्रतिनिधी असून त्यांनी शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिक अडथळ्यांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्कारामुळे युवा पिढीतील धैर्य, संवेदनशीलता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले. या बालकांच्या संकल्पपूर्ण प्रयत्नांतून २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
हेही वाचा : Nitin Vyas : वर्षानुवर्षे रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास हाच ध्यास : नितीन व्यास, अपक्ष उमेदवार, वॉर्ड क्र. २०७
 
छत्रपती संभाजीनगर येथील १७ वर्षीय अर्णव महर्षी यांनी लकवाग्रस्त रुग्णांच्या हातांच्या पुनर्वसनासाठी एआय-आधारित पुनर्वास उपकरण आणि ‘ॲक्टिव्ह हँड रिस्ट बँड’ विकसित केले आहे. स्मार्टफोन व लॅपटॉपच्या मदतीने तयार केलेल्या या नवोन्मेषी उपकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अधोरेखित झाला असून, त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0