नमस्कार मुंबई महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून सध्या सगळीकडे तिकीट वाटप आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, एक तरुण उमेदवार राजकारणात येऊ पाहत असून या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक २०७ चे अपक्ष उमेदवार नितीन व्यास (Nitin Vyas) यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला हा संवाद.
१) तुम्ही या वॉर्डमध्ये किती वर्षांपासून राहत आहात आणि इथले कोणते पाच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला जाणवतात?
- या वॉर्डमध्येच माझा जन्म झाला असून मी इथे सलग ३० वर्षांपासून राहतो आहे. आमच्याकडे म्हाडाच्या इमारती आणि जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा मोठा प्रश्न आहे. १५-२० वर्षांपासून हा पुनर्विकास रखलडेला आहे. पाण्याचा निचऱ्याची मोठी समस्या आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदाने कमी आहेत. या वॉर्डमध्ये अनेक वर्षांपासून डॉ. बीए रोडवरील एका विभाजक रेषेचे सुशोभीकरण झालेले नाही. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात घाण वाढली आहे. उद्या मी निवडून आल्यास सर्वात आधी हा प्रश्न मार्गी लावणार आहे.
२) तुम्ही राजकारणात आणि समाजकारणातही आहात, शेवटचा असा कुठला प्रश्न तुम्ही मार्गी लावला होता?
- राजकारणात मी बऱ्याच वर्षापासून आहे आणि समाजकारण माझ्या घरातूनच आले. आमचा मेडिकलचा व्यवसाय असल्यामुळे रुग्णालयांचे प्रश्न, वर्षानुवर्षे रक्तदान शिबिरे घेणे, गरजूंना मदत करणे, अशी सगळी कामे सुरुच असतात. यासोबतच लोकांना रेशन कार्ड सेवा देणे, बीएमसीकडे पाणी निचऱ्याच्या तक्रारी देणे असे बरेच प्रश्न आहेत. बरेच प्रश्न अजूनही मार्गी लागलेले नाहीत. पण आता निवडणूका होत असल्याने हळूहळू सगळे प्रश्न मार्गी लागतील.
३) इथल्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला आहे. जनतेने तुम्हाला संधी दिल्यास त्यांच्या पाठीशी कसे उभे राहणार?
- सलग १५ वर्षांपासून येथील जैन कंपाउंडचा पुनर्विकास रखडलेला आहे. मी स्वत: म्हाडाच्या इमारतीत राहत असल्याने इथले प्रश्न मला माहिती आहेत. त्यामुळे विनायक वासुदेव चाळ, म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास हे सगळे प्रश्न मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन फास्ट ट्रॅकवर सोडवता का? येतील यासाठी प्रयत्न करेल.
४) मोकळ्या मैदानांच्या प्रश्नासाठी तुम्ही तुमच्या विभागात काय उपाययोजना करणार?
- मोकळी मैदाने वाढली पाहिजे, असे माझे मत आहे. कारण खेळाडू हा मैदानातून तयार होतो. इथल्या आचरेकर मैदानात कबड्डी खेळून मुले राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे मोकळी मैदाने सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. तसेच या मैदानांना कसे सुरक्षित ठेवण्याबाबत जनतेनेही विचार केला पाहिजे. यासाठी त्यांच्यासोबत कोणता उमेदवार उभा असेल याचाही विचार जनतेने करावा.
५) मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली आहे. समजा त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार दिल्यास तुम्ही त्याला कसे सामोरे जाणार?
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली, ही आनंदाचीच बातमी आहे. पण आता २०७ वॉर्डमध्ये तशी लोकं राहिलेली नाहीत. मराठी माणूस बोलणाऱ्यांपेक्षा लोकं काम बघतात. आम्ही सलग नऊ वर्ष काम करतोय. आम्हीसुद्धा २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण या बाळासाहेबांच्या विचाराने चालतो.
६) आपल्या विभागातील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न कसा मार्गी लावणार आहात?
- बेकायदा फेरीवाल्यांसाठी एक 'हॉकर झोन' बनवला पाहिजे. जे २००४ साली पात्र होते त्यांना परवाने देऊन एक हॉकर झोन आणि जे पात्र नाहीत त्यांना सरकारमार्फत 'वन सिंगल विंडो' द्यायला हवा. सगळ्याच लोकांना दुकाने घेणे परवडणारे नसते. त्यामुळे फेरीवाले हा गंभीर विषय आहे. परंतू, अतिक्रमण होऊ नये, ही माझी ठाम भूमिका आहे. पण उद्या कुणाला व्यवसाय करायचा असल्यास महापालिकेने एक सिंगल विंडोमधून त्याचे नियोजन केले पाहिजे, असे मला वाटते.
७) या वॉर्ड मधील वाहतूक कोंडीसाठी एक कायमस्वरूपी उपाय काय सांगाल?
- वाहतूक कोंडीसाठी पार्किंग आणि चुकीच्या दिशेने वाहने चालवणे ही सगळ्यात मोठी समस्या आहे. महानगरपालिकेने त्यांच्या पार्किंग प्लॉट्सचे दर कमी करून १२०० ते १३०० रुपये घेतले, तर रोडवर पार्किंगमध्ये असलेली वाहने तिकडे जातील. पार्किंग आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.
८) या माध्यमातून आपल्या विभागातील मतदारांपर्यंत कुठल्या गोष्टी तीन गोष्टी पोहोचवणार? आणि मतदारांना आवाहन करणार?
- बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयालत केईएमसारखी सुविधा दिली पाहिजे. इकडे बीए रोडला महानगरपालिकेची शाळा नाही. शिक्षण हे सर्वांसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे इथे पालिकेची शाळा आली पाहिजे. आरोग्य, शिक्षण आणि रुग्णालये हे तीन महत्वाचे माझे विषय आहेत. मतदारांना हेच आवाहन असेल की, एवढे वर्ष तुम्ही पक्ष बघून मतदान करत आला आहात. यावेळी एक युवा तरुण उभा राहिला असून त्याला मत दिले पाहिजे. देशाचे पंतप्रधान सांगतात की, युवाशक्ती येईल तर देश घडेल. त्यामुळे यावेळी लोकांनी मोका दिला तर आपणही चौका मारू.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....