पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'अंत्योदय' या वैश्विक विचाराचा जागर

26 Dec 2025 17:00:26
Ekatma Manav Darshan Held in Mumbai
 
मुंबई : ( Ekatma Manav Darshan Held in Mumbai ) समाजातल्या शेवटच्या २६ घटकाचा विकास अर्थात 'अंत्योदय' हा वैश्विक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. पंडितजींच्या या मौलिक विचारांवर आधारित 'एकात्म मानव दर्शन' राष्ट्रीय संगोष्टीचे आयोजन उत्तन भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री  बी. एल.संतोष यांच्या शुभहस्ते या राष्ट्रीय कार्यशाळेचे मंगळवारी २९ डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे. दिनदयाल शोध संस्थानचे बीड प्रकल्प प्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांची या कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती लाभली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या दोन दिवसीय कार्यशाळेत देशभरातून सुमारे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 
अंत्योदयाच्या माध्यमानेच लोकशाहीच्या उदिष्टांची पूर्ती होईल,हा मौलिक विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मुंबईत रुईया महाविद्यालयातल्या एकात्म मानव दर्शन व्याख्यानात मांडला होता.त्या विचारांच्या आधारावरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात जनसेवेच्या अनेक योजना यशस्वी झाल्या आहेत. पंडितजींचे विचार नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्यानेच 'एकात्म मानव दर्शन' राष्ट्रीय संगोष्टीची संकल्पना राबवून तरुणांपुढे नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.
 
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांची मते मिळवायची आहेत; मुख्यमंत्र्यांची टीका
 
येत्या २९ आणि ३० डिसेंबर रोजी आयोजित 'एकात्म मानव दर्शन' राष्ट्रीय कार्यशाळेत वसुधैव कुटुंबकम, राष्ट्र निर्माणाचा आधार कौशल्य विकास शिक्षण आणि प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि एकात्म मानव दर्शन समरसता मूल्य शिक्षण या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन होणार आहे. ऑर्गनायझर नवी दिल्ली आवृत्तीचे संपादक प्रफुल्ल केतकर यांच्या 'एकात्म मानव दर्शन- वसुधैव कुटुंबकम' या विषयावरील मार्गदर्शनाने व्याख्यानमालेचे पहिले पुष्प वाहिले जाणार आहे. तर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे या सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे विविध मान्यवर तसेच ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर, डॉ. प्रा. प्रशांत साठे, वरिष्ठ सनदी अधिकारी नरहरी आणि योजक चे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्यासह अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0