उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांची मते मिळवायची आहेत; मुख्यमंत्र्यांची टीका

    26-Dec-2025   
Total Views |
Devendra Fadnavis
 
मुंबई : ( Devendra Fadnavis ) उद्धव ठाकरेंना विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांची मते मिळवायची आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना उबाठा गटात प्रवेश देण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने मतांचे लांगूलचालन करण्यासाठी रशीद मामूसारख्या व्यक्तीला प्रवेश दिला आहे. यातून त्यांचे चरित्र आणि त्यांची दिशा स्पष्ट होते. आता त्यांना लांगूलचालन करायचे आहे. विशिष्ट लोकांचे जोडे चाटून त्यांची मते मिळवायची आहेत. पण जनता हे बघते आहे. देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोक हे पाहत असून त्यांना याचे नुकसान सहन करावे लागेल," असे ते म्हणाले.
 
हेही वाचा : भारतीय लष्कराकडून सोशल मीडिया वापराच्या नियमांमध्ये मोठा बदल! केवळ ‘पॅसिव्ह पार्टिसिपेशन’ राहणार अनिवार्य
 
पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते
 
भाजप आणि शिवसेनेच्या यूतीच्या घोषणेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "आम्हाला युतीची घोषणा करण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही एकत्रच आहोत. ठाकरे बंधू वेगवेगळे होते. पुतीन आणि झेलेन्स्की एकत्र आले तर युती करावी लागते. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्रित येऊन घोषणा केली. पण त्यांनी काय केले ते माहिती नाही. कारण युती केली, पण जागा घोषित करणार नाही, असे ते म्हणतात. आमचे नीट चाललेले असून सगळे झाल्यावर जागावाटपाबद्दल सांगू," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
 
संस्कृती आणि धर्माकरिता बलिदान देणाऱ्यांना नमन करणे महत्वाचे
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजचा दिवस वीर बाल दिवस घोषित केला असून गेले काही वर्षे तो आपण साजरा करतो आहोत. शीख समाजाचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंग यांचा संपूर्ण परिवार शहीद झाला आणि आजच्याच दिवशी त्यांचे दोन सुपुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांना मुघलांनी भींतीमध्ये चिरडून टाकून त्यांचा खात्मा केला. अशा पद्धतीने शहीद झालेल्या या दोन्ही सुपुत्रांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा दिवस साजरा होता. शीखांच्या गुरुंनी ज्याप्रकारे धर्म आणि मानवता वाचवण्याकरिता बलिदान दिले ते जगाच्या इतिहास वेगळ्या प्रकारचे आहे. त्यांच्या बलिदानामुळेच आपण सगळे हा दिवस बघू शकतो. त्यामुळे देशाच्या संस्कृती आणि धर्माकरिता ज्यांनी बलिदान दिले त्यांची आठवण करून त्यांना नमन करणे महत्वाचे आहे. त्यासाठीच मी आज गुरुद्वारामध्ये आलो," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....