मुंबई : ( Maharashtra ST Buses ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांची सुरक्षा, विशेषतः महिला प्रवाशांची सुरक्षितता, सर्वोच्च मानून महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत महामंडळाच्या ४८ बसस्थानकांवर “महिला सुरक्षा रक्षक” यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्याच्या माध्यमातून, महिला सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांची सुरक्षा, धावपळीतून दक्षता, सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांबद्दल जागरूकता आणि प्रवाशांना मदत करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार माहे. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व स्थानकांवर पाकिटमार, चोरी, महिला छेडछाड, घर सोडून आलेल्या महिलांना मदत, मनोविकारांना मदत यांसारख्या ७०६ घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांनी जबाबदारीने कामगिरी केली आहे. त्यातील ३० प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद झाले आहेत.
या कालावधीत, १८२ प्रकरणांमध्ये महिलांची छेडछाड, विद्यार्थिनींची छेडछाड, महिलांचे दागिने, पैसे चोरणे, मनोविकार महिलांना व घर सोडून आलेल्या महिलांना मदत पुरवणे अशा विविध गुन्हेगारी व सामाजिक स्वरूपाच्या घटनांना सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षकांनी अत्यंत दक्षतेने हाताळून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा : ऊर्जा कंपन्यांच्या वाहनचालकांसाठी महापारेषण तर्फे लोणावळ्यात कार्यशाळा
प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना
सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत या कामगिरीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना अधिक दक्ष राहण्याबाबत व आपली कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांकडून ही कार्यक्षम आणि दक्षतेची कामगिरी सातत्याने केली जात आहे. परिणामी सुरक्षा रक्षकांनी व महिला सुरक्षा रक्षकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणाऱ्या घटनांना प्रतिबंध घालण्यात महामंडळाला मोठे यश प्राप्त झाले आहे.