मुंबई : ( Atal Canteen ) दिल्ली सरकार लवकरच 'अटल कँन्टीन' योजना सुरू करणार आहे. या योजनेमुळे आता फक्त ५ रुपयांत जेवण मिळणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने २५ डिसेंबर रोजी ४५ कॅन्टीनचे उद्घाटन करण्यात आले आहे तर उर्वरित ५५ कँन्टीन लवकरच सुरू होणार आहेत.
या योजनेमुळे आता गरीब, मजुरांना आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना स्वस्तात पौष्टिक जेवण उपलब्ध होणार आहे. या कँन्टीन वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ असणार आहे. अटल कँन्टीन योजनेअंतर्गत मिळण्याऱ्या या ५ रुपयांच्या थाळीत दोन चपात्या, मिक्स भाजी, डाळ, भात आणि लोणचे असे पोटभर जेवण मिळणार आहे. प्रत्येक कँन्टीनमध्ये सुमारे ५०० ते १००० लोकांना हे पौष्टिक जेवण मिळू शकणार आहे.
हेही वाचा : ‘राष्ट्र प्रेरणा स्थळ’ भारताच्या आत्मसन्मान आणि एकतेचे प्रतीक : पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्वच्छता आणि अन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी सरकारने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच टोकन व बायोमेट्रिक पद्धतीने जेवण वाटप केले जाणार आहे यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. आधुनिक स्वयंपाकघर, एलपीजी आणि आरओ पाणी यांचीदेखील सोय या योजने अंतर्गत करण्यात आली आहे.
"अटल कॅन्टीनमुळे गरीबांना सन्मानाने जेवण मिळेल आणि उपासमारी कमी होईल. हे कॅन्टीन दिल्लीचा आत्मा बनेल", असे दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले. लोकांच्या प्रतिक्रियेनुसार आणखी कॅन्टीन वाढवल्या जातील. तसेच अटलजींच्या नावाने ही योजना त्यांच्या सुशासन आणि गरीबकल्याणाच्या वारशाला साजेशी असल्याचेही दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले आहे.